मोठी बातमी; भाजपच्या मंत्र्याने बळकावली माजी राष्ट्रपतींचीच शेती… पाटील कुटुंबीयांचा मंत्री जयकुमार रावल यांच्यावर थेट आरोप…

 

जळगाव समाचार | २८ सप्टेंबर २०२५

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह सहा वारसांच्या मालकीची दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील सुमारे ३३ एकर २० गुंठे शेती बळकावल्याचा गंभीर आरोप राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आला आहे. हा आरोप प्रतिभाताई पाटील यांच्या नातलग किशोरसिंग पाटील तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सदर जमीन नारायणसिंग पाटील यांच्या नावावर वारसा हक्काने होती. त्यांच्या निधनानंतर दिलीपसिंग, रणजितसिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग शेखावत, गजेंद्र, विलासराव आणि अरुणा गुणवंतसिंग पाटील या वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यात आली. तरीदेखील, २००७ पासून मंत्री रावल यांच्या कुटुंबाकडेच या जमिनीचा ताबा असल्याचा आरोप करण्यात आला. रावल कुटुंबाने या जमिनीच्या खरेदीसंदर्भात तोंडी करार असल्याचा दावा स्थानिक न्यायालयात दाखल केला होता, मात्र तो दावा फेटाळला गेला. त्यानंतर धुळे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले, परंतु तिथेही तो दावा फेटाळण्यात आला.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, २५ सप्टेंबर रोजी पाटील कुटुंबीय न्यायालयाच्या बेलीफांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी मालपूर येथे गेले असता, मंत्री रावल यांच्या समर्थकांनी त्यांना विरोध करून हुसकावून लावले. या वेळी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला असूनही पोलीस प्रशासनाने आवश्यक ते संरक्षण न देता उलट रावल कुटुंबाच्या बाजूने उभे राहिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

दरम्यान, दोंडाईचा येथील जमीन प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या संदर्भात भाष्य करणे उचित ठरणार नसल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी माध्यमांना दिली. तसेच हे प्रकरण दिवाणी स्वरूपातील असून, संबंधितांच्या तक्रारीवरून यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here