जळगाव समाचार | २८ सप्टेंबर २०२५
ममुराबाद रोडवरील एल. के. फॉर्म येथे परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने केला आहे. या कारवाईत कॉल सेंटरमधील एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी एल के फार्मचे मालक ललित कोल्हे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक नखाते यांना शनिवारी (२७ सप्टेंबर) या बोगस कॉल सेंटरबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत रविवारी (२८ सप्टेंबर) दुपारी एक वाजता एल. के. फॉर्मवर छापा टाकला.
धाडीत ३१ लॅपटॉपसह कॉल सेंटरचा संपूर्ण सेट-अप पोलिसांच्या हाती लागला. प्राथमिक तपासात हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचारी स्वतःला ‘अधिकृत एजंट’ म्हणून सादर करत, डेटा चेक करण्याचे आमिष दाखवत किंवा विविध बहाण्यांनी परदेशी नागरिकांना फसवत होते.
छाप्यावेळी उपस्थित असलेले आठ जण पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी कबूल केले की, या कॉल सेंटरमध्ये सुमारे २० ते २५ जण कार्यरत होते. अटक झालेले बहुतेक आरोपी हे राज्याबाहेरील असल्याचे उघड झाले असून, या रॅकेटचे आंतरराज्यीय स्तरावर जाळे असल्याची शक्यता तपासली जात आहे.
संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून, पोलिसांनी जप्त केलेला डेटा व उपकरणांची तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या या धडक कारवाईमुळे जळगावात ऑनलाईन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.