करूरमध्ये थलपती विजयच्या सभेत भीषण चेंगराचेंगरी; ३८ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी

 

जळगाव समाचार | २८ सप्टेंबर २०२५

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि नुकताच राजकारणात प्रवेश केलेला थलपती विजय याच्या शनिवारी करूर येथे झालेल्या सभेत मोठी दुर्घटना घडली. विजयच्या सभेसाठी हजारो लोकांचा जमाव जमला होता. गर्दी अनियंत्रित झाल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोंधळाच्या दरम्यान एक मूल बेपत्ता झाल्याची माहितीही समोर आली आहे.

विजयने नुकताच ‘तमिझगा वेत्री कळगम’ (TVK) या पक्षाची स्थापना केली असून, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तो तयारी करत आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी करूर येथे आयोजित सभेला प्रचंड गर्दी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने भाषण अर्धवट सोडले आणि पोलिसांना लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. दुर्घटनेनंतर विजयने एक्सवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “या घटनेमुळे मला अतोनात वेदना झाल्या आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांना माझी आदरांजली. त्यांच्या कुटुंबांबद्दल मला सहानुभूती आहे. सर्व जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी मी प्रार्थना करतो.”

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “करूर येथे राजकीय सभेदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अतिशय हृदयद्रावक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना बळ मिळो, अशी प्रार्थना करतो. तसेच सर्व जखमी लवकर बरे व्हावेत, ही इच्छा व्यक्त करतो.”

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत, तर जखमींना १ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय तपास आयोग नियुक्त करण्यात आला आहे. सरकारकडून अधिकाऱ्यांना रुग्णालयात योग्य उपचार आणि मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले असून, या चौकशीतून दुर्घटनेची कारणं स्पष्ट होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here