जळगाव समाचार | २७ सप्टेंबर २०२५
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून, संपर्क तुटला आहे. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे, तर पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना, आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने चिंता वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होणार असून, ५ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रात राहणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रभर मुसळधार पावसाची शक्यता असून, मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान खात्याने मराठवाड्यासह कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. विशेषतः नांदेड, लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून, पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, आज दिवसभर जोरदार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.