जळगावात विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन; अटक करण्यासाठी गाड्या अपुऱ्या…

 

जळगाव समाचार | २५ सप्टेंबर २०२५

ईव्हीएम यंत्र हटविण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी शहरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जिल्हा संयोजक वसंत कोलते, बौद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव आणि बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक पंकज तायडे यांनी केले.

आंदोलनाची सुरुवात जीएस मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर फेरी नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकापर्यंत काढण्यात आली. येथे पोलिसांनी आंदोलकांना अडविले. त्यानंतर स्त्री-पुरुष आंदोलकांनी स्वखुशीने अटक दिली. पोलिसांचा मोठा ताफा असूनही अटक करण्यासाठी गाड्या अपुऱ्या पडल्याचे दृश्य दिसले.

आंदोलकांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे, ओबीसी व इतर सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करणे, बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देणे, आदिवासींवरील अन्याय थांबविणे, मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण करणे, एस.सी., एस.टी., ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करणे, महिलांचा सन्मान व सुरक्षा वाढविणे, राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, कंत्राटी भरती रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, खाजगी शिक्षणातील लूट थांबवणे यांसह विविध मागण्या शासनाकडे केल्या. तसेच जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.

या आंदोलनात सुमित्र अहिरे, राजु खरे, डॉ. शाकीर शेख, प्रमोद सौंदाणे पाटील, सुनिल देहडे, जाकीर कुरेशी, खुमानसिंग बारेला, धनराज बंजारा, गोपाळ कोळी, भरत पाटील, योगेश सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे, जगदीश सपकाळे, गनी शाह, रविंद्र बाविस्कर, विजय सुरवाडे, बापु सोनवणे, मुकुंद सपकाळे, अय्याज अली, बळवंत भालेराव, विजय निकम, विनोद निकम, फारुख शेख, सुनील सुरवाडे, भोजराज सोनवणे, अमजद रंगरेज, चंद्रशेखर अहिरराव, पी.डी. सोनवणे, दिलीप तासखेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here