जळगाव समाचार | २५ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला यांसह फळबागा आणि कडधान्ये उध्वस्त झाली आहेत. असंख्य जनावरे दगावली असून गोठे व चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळली असून, नदी-नाल्यांना पूर आल्याने नागरिक वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीही सरकारकडे थेट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून कठोर शब्दांत हाक दिली आहे. “पंचनाम्याचे सोपस्कार आणि निकषांचे खेळ न करता शेतकऱ्यांना थेट मदत द्या. निवडणुकीच्या काळात माझी लाडकी बहीण योजना राबविताना सरकारने कोणतेही कागदपत्र तपासले नाहीत. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनाही तातडीची मदत द्या. पंचनामे, कागदपत्रांची पडताळणी आणि विविध अटींच्या नावाखाली होणारा विलंब अमान्य आहे,” असे ते म्हणाले.
खडसे यांनी पुढे बोलताना ३३ टक्के नुकसानीच्या निकषावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेती क्षेत्राला तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळावी. पंचनाम्यांच्या प्रक्रियेत निकष कमी करून सरसकट मदत देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहतील,” असा ठाम पवित्रा त्यांनी मांडला.
दरम्यान, बुधवारी भाजप किसान मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पोपट भोळे, सुरेश धनके, विजय पाटील, राजेंद्र सोनवणे, विजय महाजन, देवेंद्र पाटील, राहुल महाजन, मनोज पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या हानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली.
भाजप किसान मोर्चाने सुद्धा स्पष्ट केले की, अतिवृष्टीमुळे जमिनीचा पृष्ठभाग खरडून गेला, घरांची पडझड झाली, बांधबंदिस्ती फुटून शेती उद्ध्वस्त झाली, पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, बेघर झालेल्या नागरिकांना घरे, जीवनावश्यक वस्तू तसेच कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा. याशिवाय, केळी पिकाला हमीभाव मिळावा, अशी मागणीही मोर्चाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.