यावलमध्ये पशुधन अधिकारी मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

 

जळगाव समाचार | २५ सप्टेंबर २०२५

यावल शहरातील विस्तारीत वसाहती परिसरात दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परिसरातील रहिवाशांना एका घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घर उघडून पाहिले असता पशुधन अधिकारी भगुरे मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

मृत अधिकारी हे मूळ परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रहिवासी असून, ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते. ते यावल शहरातील आत्माराम गुरूजी व मुश्तफा खान यांच्या ग्लोबल स्कूलसमोर असलेल्या घरात एकटेच राहत होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते. आज त्यांच्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी संशय व्यक्त करत पोलिसांना कळवले. तपासणीदरम्यान ते मृत अवस्थेत आढळून आले.

प्राथमिक तपासानुसार, भगुरे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकटे राहात असल्याने अचानक आलेल्या आजारात त्यांना उपचार मिळू शकले नसल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला असून, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here