जळगावात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

जळगाव समाचार | २५ सप्टेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जळगाव येथील क्षेत्र अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत अधिकाऱ्याच्या कार्यालयातून सुमारे दोन लाख २६ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने बुधवारी ही कारवाई केली. संशयितांची नावे राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (४२, रा. पंचवटी, नाशिक) आणि त्याचा खासगी पंटर मनोज बापू गजरे अशी आहेत.

तक्रारदार रावेर येथील एका रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून त्यांच्या रुग्णालयाच्या जैविक कचऱ्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुर्यवंशी यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीदरम्यान सुर्यवंशी यांनी गजरेमार्फत लाच घेण्याची व्यवस्था केली. ठरल्याप्रमाणे सापळा कारवाई करण्यात आली आणि दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे आणि शिपाई भूषण पाटील यांच्या पथकाने केली. जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसांत पोलिस आणि आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवायांमुळे शासकीय कार्यालयांमध्ये वाढती लाचखोरी उघडकीस आली आहे. कायदा-सुव्यवस्था आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असणारेच अधिकारी लाचखोरीत अडकताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here