जळगाव समाचार | २२ सप्टेंबर २०२५
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.नं. येथील प्रतिक्षा चेतन शेळके (वय २३) या विवाहितेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कार खरेदीसाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्याचा पतीसह सासरच्या मंडळींकडून सतत तगादा लावला जात होता. प्रतिक्षाने यास नकार दिल्याने तिच्यावर शिवीगाळ, मारहाण आणि छळ सुरू झाला. दरम्यान, ती गर्भवती असल्याने तिला गर्भपात करण्यासही भाग पाडले जात होते, यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. अखेर १८ सप्टेंबर रोजी प्रतिक्षाने सुसाईड नोट लिहून जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षाचा विवाह खरजाई (ता. चाळीसगाव) येथील चेतन शेळके याच्याशी झाला होता. सासरच्यांकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती तिने माहेरी दिल्यानंतर तिचे वडील व बहिण खरजाई येथे गेले होते. तेव्हा मामसासरे दिनेश पाटील आणि मावस सासू छाया पाटील यांनी त्यांच्यासह प्रतिक्षाच्या बहिणीवर देखील मारहाण केली होती. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षा माहेरी वास्तव्यास होती. मात्र सततच्या छळामुळे ती नैराश्यात गेली आणि अखेर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.
या घटनेनंतर प्रतिक्षाचे वडील भागवत धामणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पती चेतन राजेंद्र शेळके, सासरे राजेंद्र नारायण शेळके, सासू वैशाली राजेंद्र शेळके, दीर गौरव राजेंद्र शेळके (सर्व रा. खरजाई, ता. चाळीसगाव) तसेच मामसासरे दिनेश पाटील व मावस सासू छाया दिनेश पाटील (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल वाघ हे करीत आहेत.