जळगाव समाचार | १९ सप्टेंबर २०२५
रावेर रेल्वे स्थानकावर प्रवाशाला मारहाण करून ४ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा, जळगावने केला आहे. गुरुवारी (१८ सप्टेंबर) रात्री जी.एस. ग्राऊंड परिसरातून चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या यशस्वी कारवाईबाबत माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा प्रकार मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी रावेर रेल्वे स्थानकावर घडला होता. बऱ्हाणपूर (म.प्र.) येथील रहिवासी सुधाकर धनलाल पटेल (६०) कामयानी एक्सप्रेसने प्रवास करत असताना, आरोपींनी त्यांना मारहाण करून बॅग हिसकावून पळ काढला होता. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रेल्वेत दरोडा टाकणारे हेच आरोपी जळगाव शहरातील जी.एस. ग्राऊंड येथे चोरीच्या पैशांची वाटणी करण्यासाठी एकत्र येणार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना ही माहिती मिळताच, त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रीतम पाटील, यशवंत डहाकडे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे आणि मयूर निकम यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ९ वाजता सापळा रचून आरोपी किरण पंडित हिवरे (३२), अजय सुपडू कोचुरे (२५), हरीश अनिल रायपुरे (२५) व गोकुळ श्रावण भालेराव (२७) या चौघांनाही अटक केली.
यावेळी आरोपींकडून ४ लाख ५० हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली असून, चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल लोहमार्ग पोलीस, भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.