जळगाव समाचार | १७ सप्टेंबर २०२५
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात उभारण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. मनपाच्या निष्काळजी धोरणाविरोधात संताप व्यक्त करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कचरा केंद्रामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने माशा, डास, उंदीर यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन होत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले. शासकीय तंत्रनिकेतनसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणारी ही परिस्थिती असह्य असल्याचे सांगून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
स्थानीक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त केला. मुलांचे शिक्षण व आरोग्य धोक्यात घालणाऱ्या परिस्थितीला सहन न करण्याचा इशारा देण्यात आला. कचरा संकलन केंद्र कायमस्वरूपी बंद न केल्यास कायदेशीर मार्गाने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला. “याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेवर राहील,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, विनोद शिंदे, ललित शर्मा, रज्जाक सय्यद, प्रकाश जोशी, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, दीपक राठोड, प्रदीप पाटील, भूषण ठाकूर, राहुल चव्हाण, विशाल जाधव, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे यांच्यासह शासकीय आयटीआय मधील सर्व शिक्षक व दोनशे विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी भेट देऊन दहा दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान चालविणाऱ्या संस्थेनेच शहराच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग लावणे ही लज्जास्पद बाब असल्याची भावना आंदोलनात व्यक्त झाली.