जळगाव समाचार | १७ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. त्यांनी जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
जामनेर तालुक्यातील नेरी (भोरटक्के नगर, इंदिरा नगर, बाजार पट्टा) आणि पाचोरा तालुक्यातील शिंदाड, सातगाव या गावांना भेट देऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवितहानी झाली नसली तरी, वित्तहानी झाली आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. आपत्तीग्रस्त भागात प्रशासनामार्फत बचाव कार्य सुरू असून, एनडीआरएफच्या टीम मदतीसाठी कार्यरत आहेत. या भागातील पाऊस थांबल्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आहे. नुकसान झालेल्या भागांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यावेळी मंत्री महाजन यांनी शिंदाड, सार्वे बुद्रुक, आणि सातगाव या गावांमध्ये स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना धीर दिला. “शासन आपल्यासोबत आहे, आणि लवकरच नुकसानीची भरपाई दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव आणि बरखेडी मंडळांमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे आणि वाणेगाव या गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. अंदाजे 350 ते 400 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, सुमारे 400 जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे. पाहणी दौऱ्यात महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.