आज पासून “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचे आयोजन; महिलांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध

 

जळगाव समाचार | १७ सप्टेंबर २०२५

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान सुरू झाले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या अभियानांतर्गत महिलांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा पुरवण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना विविध आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे हा आहे. या अभियानासाठी डॉ. किरणे सुपे आणि डॉ. प्राची सुरतवाला यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिबिरांमध्ये महिलांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये स्त्रीरोग तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, आणि कर्करोग तपासणी (स्तन, मुख, गर्भाशय) यांचा समावेश आहे. तसेच रक्तक्षय, क्षयरोग आणि सिकलसेल सारख्या आजारांची तपासणी व मार्गदर्शन देखील केले जाईल. याव्यतिरिक्त, शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळे, कान, नाक, घसा आणि त्वचा रोग तपासणी केली जाईल. मानसिक आरोग्य व दंतरोगाशी संबंधित तपासणीची सोयही यात आहे. आवश्यक असल्यास, रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यानंतर १८ सप्टेंबर रोजी अमळनेर, मुक्ताईनगर आणि अंतुर्ली येथे शिबिरे होतील. १९ सप्टेंबर रोजी पारोळा, चोपडा, शेळावे व अडावद येथे तर २० सप्टेंबर रोजी धरणगाव, जामनेर, पाळधी व नेरी येथे शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत विविध ठिकाणी ही शिबिरे सुरू राहतील, ज्यात पाचोरा, यावल, भडगाव, रावेर, चाळीसगाव, बोदवड, एरंडोल, भुसावळ आणि इतर अनेक गावांचा समावेश आहे.
या अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी मोहाडी येथील महिला रुग्णालय आणि कानळदा, निंभोरा येथील ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सर्व महिलांना या आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आणि स्वतःची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here