केसीई सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव समाचार | १६ सप्टेंबर २०२५

खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचा व आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या या संस्थेने गेल्या ८१ वर्षांत खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना ‘झेन जी’सारख्या नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली. कान्ह कला मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष श्री. डी.टी. पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात शैक्षणिक संचालक प्रा. मृणालिनी फडणवीस यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार केसीई सोसायटी विविध शाखांमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली, योग विज्ञान यांसारख्या अभ्यासक्रमांत शिक्षण उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेत, मागील काही वर्षांत आयएमआर, इंजिनीअरिंग कॉलेज, लॉ कॉलेज, वसतिगृह आणि नाट्यगृह अशा सुविधांची भर पडल्याचा उल्लेख केला. कार्यक्रमात संस्थेच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणारी चित्रफीतही दाखवण्यात आली.

या सोहळ्यात संस्थेच्या १६ शाखांनी आपापल्या शैक्षणिक वाटचालीची माहिती सादर केली. सोहम योगा सेंटर, एकलव्य क्रीडा संकुल, एस.एस. मणियार लॉ कॉलेज, किलबिल बालक मंदिर, जी.पी.व्ही.पी. शाळा, ए.टी. झांबरे माध्यमिक शाळा, ओरीओन इंग्लिश मिडीयम शाळा, एम.जे. कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, आय.एम.आर., स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन, ओजस्विनी कला महाविद्यालय आदी शाखांनी त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर आणि मुख्याध्यापक प्रणिता झांबरे यांनी केले. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here