जळगाव समाचार १५ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” (DAJGUA) ही नवी सहयोजना सुरु केली आहे. राज्य शासनाने ४ सप्टेंबर २०२५ रोजी या उपक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली असून, आदिवासी समाजाच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील असमतोल कमी करण्याचा त्यामागील मुख्य उद्देश आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्र, मत्स्यसंवर्धन तलाव, निविष्ठा अनुदान, इन्सुलेटेड वाहन, मोटरसायकल व तीनचाकी सह आईस बॉक्स, फिश किऑस्क, शितगृह, बर्फ कारखाना, मत्स्यखाद्य निर्मिती यांसारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश असून पारंपारिक मच्छीमारांसाठी नौका व जाळे पुरवठा यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या योजनेत जळगाव जिल्ह्यातील १२ आकांक्षित तालुक्यांमधील ११२ आदिवासी बाहुल्य व प्रभावित गावांचा समावेश करण्यात आला आहे. साधारणपणे १०,००० समुदायांतील १,००,००० वैयक्तिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून अनुदानाचा वाटा ९०% व लाभार्थी हिस्सा १०% असा राहणार आहे; त्यात ६०% केंद्र हिस्सा आणि ४०% राज्य हिस्सा असणार आहे. योजना लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.