जळगाव समाचार | १३ सप्टेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीविरुद्ध आशा कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ येथील आशा कर्मचारी नलिनी कैलास गवळी गरोदर मातांची नोंदणी करत असताना भवानी नगर येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीची नोंदणी करण्याची विनंती केली. त्यानुसार नोंदणीसाठी त्या मुलीसह इतर महिलांना सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले. तपासणीत ती मुलगी वयाने १६ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. विचारपूस करताना तिच्या पालकांनी एका वर्षांपूर्वी तिचे भिलाली येथील समाधान कैलास सोनवणे याच्याशी लग्न लावून दिले असून त्याच्यासोबत संबंध झाल्याने ती गर्भवती राहिल्याची माहिती दिली.
या घटनेवरून मोहाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला. शून्य नंबरने नोंदविलेला हा गुन्हा अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.