भुसावळात कौटुंबिक वाद उफाळल्याने तरुणाने केला बायकोच्या मामाचा खून; सासराही गंभीर…

0
10

 

जळगाव समाचार | १३ सप्टेंबर २०२५

भुसावळ शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अयान कॉलनी येथे राहणाऱ्या सुभान शेख भिकन या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या सासऱ्याच्या नात्यातील व्यक्तीवर धारदार चाकूने हल्ला करत त्याचा खून केला. या हल्ल्यात सासऱ्यालाही गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही उपचारासाठी भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी समद शेख याला मृत घोषित केले, तर जमील शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृताचे नाव शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी, ता. भुसावळ) असून जखमी शेख जमील शेख शकूर (वय ५२, रा. धुळे) अशी आहे. जमील शेख यांची मुलगी ही आरोपी सुभान शेख याच्याशी विवाहबद्ध आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी सुभान आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर तिच्या वडिलांना कळविल्यानंतर जमील शेख यांनी आपले शालक समद शेख याला सोबत घेऊन संध्याकाळी मुलीच्या घरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढून संतापलेल्या सुभान शेखने समद शेखवर मानेवर, छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार करत त्याचा खून केला. त्याचवेळी जमील शेख यांनाही गंभीर जखमा झाल्या.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व संशयित आरोपी सुभान शेख याला ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरू केली आहे. समद शेख हा हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुले आणि भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे भुसावळ शहर व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here