पाळधी–तरसोद बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातात घट

 

जळगाव समाचार | १२ सप्टेंबर २०२५

पाळधी ते तरसोद दरम्यानचा बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पाळधीहून तरसोदला जाण्यासाठी लागणारा वेळ पूर्वीच्या पाऊण तासांवरून अवघ्या २० मिनिटांवर आला आहे. इंधन खर्चातही बचत होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्यांचे काम वेगाने सुरू असून काही सेवा रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. उड्डाणपुलांच्या लगत असलेल्या सेवा रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील रस्ते थेट बाह्यवळण महामार्गाशी जोडले जात आहेत. भुसावळ, एरंडोल, धरणगाव आदी भागाकडे जाण्यासाठी कमी अंतराची सोय निर्माण झाल्याने संबंधित गावांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शहराचा विस्तार उत्तरेकडे होण्यासही चालना मिळत आहे.

महामार्गालगतच्या गावांतील सुशिक्षित तरुण आणि शेतकरी कृषी आधारित उद्योग सुरू करण्याकडे वळत असून, शासनाच्या २०२३ च्या औद्योगिक धोरणानुसार डी प्लस दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील विकसकांनी मोक्याच्या जमिनींची पाहणी सुरू केली असून, स्वस्त दरातील जमीन गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. बाह्यवळण महामार्गामुळे जळगाव शहरासह परिसराचा विकास वेगाने घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here