गणपती विसर्जनादरम्यान गिरणा नदीत बुडालेल्या दोघांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला…

0
14

जळगाव समाचार | ११ सप्टेंबर २०२५

वाघ नगर येथील रहिवासी असलेला राहुल रतिलाल सोनार (३४) याचा गणपती विसर्जनाच्या दिवशी गिरणा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. मित्र विश्वनाथ पाटील याच्या सोबत तो आर्यन पार्क येथील नदीपात्रात विसर्जनासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. विश्वनाथ पाटील याला स्थानिकांनी वाचवले, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे राहुल वाहून गेला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने अथक शोधकार्य सुरू केले.

पाच दिवसांनंतर बुधवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सावखेडा शिवारात गिरणा नदीच्या पात्रात राहुलचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर मृतदेहाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. जळगाव तालुका पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शहरात या घटनेने शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ममुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी (२७) हा देखील गणपती विसर्जनासाठी पाळधी-तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण पुलाखाली उतरला असता बुडून बेपत्ता झाला आहे. गिरणा धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे त्याचा शोध घेण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. नदीच्या किनाऱ्यावरील विविध गावांमध्ये शोधकार्य सुरू असून पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले होते. प्रशासनाने शोधकार्य सुरूच ठेवले असून, बेपत्ता गणेशच्या शोधासाठी प्रयत्न चालू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here