जळगाव समाचार | ९ सप्टेंबर २०२५
नेपाळमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेने आणि वाढत्या असंतोषाने गंभीर स्वरूप घेतले आहे. सोशल मीडियावर बंदी आणि सरकारी भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून, देशातील असामान्य परिस्थितीवर घटनात्मक आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
“घटनात्मक तोडग्यास हातभार लावण्यासाठी राजीनामा” – ओली
राजीनामा जाहीर करताना केपी शर्मा ओली यांनी सांगितले,
“नेपाळच्या राज्यघटनेतील कलम ७६ (२) नुसार मला पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले होते. देशात निर्माण झालेली असामान्य परिस्थिती लक्षात घेता आणि घटनात्मक तोडगा शोधण्याच्या प्रयत्नांना मदत व्हावी यासाठी मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. नेपाळच्या संविधानातील कलम ७७ (१) नुसार मी तात्काळ पदावरून पायउतार होत आहे.”
सोशल मीडिया बंदीविरोधातून आंदोलन तीव्र
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी भ्रष्टाचाराविरोधात संताप उसळला होता. विरोधकांसह सामान्य नागरिकांनीही सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. सोमवारी नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात तरुणाईने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे Gen Z वयोगटातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “बंदी भ्रष्टाचारावर आणा, समाजमाध्यमांवर नाही” अशा घोषणा दिल्या.
संतप्त जनतेच्या दबावामुळे सरकारला १९ तासांतच सोशल मीडिया बंदी उठवावी लागली. परंतु, बंदी उठवल्यानंतरही आंदोलनाचा उद्रेक थांबला नाही.
सोमवारी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलनाने उग्र स्वरूप घेत काठमांडूसह देशभर सरकारी इमारतींवर हल्ले सुरू झाले. पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान पेटवून दिले गेले. सत्ताधारी पक्षातील इतर नेत्यांच्या घरांनाही आग लावण्यात आली. संसद भवनातही तोडफोड व जाळपोळ झाली असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
नेपाळचे अर्थमंत्री व उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद पौडेल यांनाही आंदोलकांनी घेरून मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लष्कराने हस्तक्षेप करून सुरक्षा पुरवली
आंदोलन हिंसक होत असल्याचे पाहून नेपाळचे लष्करप्रमुख अशोक सिंघल यांनी पंतप्रधान ओली यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ओली यांनी पद सोडले. त्यानंतर लष्कराने मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवण्यास सुरुवात केली असून, हेलिकॉप्टरद्वारे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही दिला राजीनामा
दरम्यान, आंदोलकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानी आग लावल्याने त्यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलकांनी सरकारी इमारतींवर हल्ले केले असून परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.