आज देशाला मिळतील नवे उपराष्ट्रपती

 

जळगाव समाचार | ९ सप्टेंबर २०२५

उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) विजयासाठी पुरेसे संख्याबळ असले तरी यावेळी भाजपने सावधगिरी बाळगल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय मोठ्या फरकाने झाला होता. त्यावेळी त्यांना ७५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. यावेळी मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल व ‘एनडीए’चे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना सुमारे ५५–५६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ४५ टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संख्याबळ असले तरी फरक मोठा नसल्याने भाजपने घटक पक्षांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एनडीएतील पक्षांसह वायएसआर काँग्रेस, बीआरएस, बिजू जनता दल आदी पक्षांशी संपर्क साधून एकेका मतासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्रॉस व्होटिंगमुळे विजय धोक्यात येऊ शकतो, याची भाजपला जाणीव असून म्हणूनच शनिवारीच खासदारांना दिल्लीत बोलावून मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली.

लोकसभा आणि राज्यसभेतील संभाव्य पाठिंबा पुढीलप्रमाणे आहे:
• लोकसभा: एनडीएकडे २९३ सदस्यांचे पाठबळ मानले जाते. वायएसआर काँग्रेसच्या ४ सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास ते २९७ पर्यंत पोहोचू शकते. इंडिया आघाडीला २४५ सदस्यांचे पाठबळ असून एआयएमआयएमनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. आम आदमी पक्ष (आप) इंडिया आघाडीचा भाग नसला तरी त्याचे ३ सदस्य विरोधकांना समर्थन देतील, अशी शक्यता आहे.
• राज्यसभा: एनडीएकडे १३१ सदस्यांचे पाठबळ असून वायएसआर काँग्रेसचे ७ सदस्यही त्यांना साथ देतील, असा अंदाज आहे. ‘आप’चे ९ सदस्य विरोधकांसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएला १४५–१५० आणि इंडिया आघाडीला ८८–९० मतांचे पाठबळ मिळू शकते.

संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मिळून एकूण ७८१ सदस्य असून बहुमतासाठी ३९१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या काही जागा रिक्त आहेत. बीआरएसने मतदानात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या राज्यसभेतील ४ सदस्य अनुपस्थित राहतील. त्याचप्रमाणे बिजू जनता दलानेही मत न देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या ७ सदस्यांचा मतदानात सहभाग राहणार नाही. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक संख्या ३८६ पर्यंत घटण्याची शक्यता आहे.

पुरेसे संख्याबळ असले तरी मतांचा फरक मोठा नसल्याने भाजपला प्रत्येक मत महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे घटक पक्षांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. तर विरोधकही आपली बाजू मजबूत करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. आज होणारे मतदान कोणाच्या बाजूने जाईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here