जळगाव समाचार | ६ सप्टेंबर २०२५
शहरात गणेशोत्सवाच्या समारोपाचा उत्साह ओसंडून वाहत असताना शनिवारी विविध मंडळांतर्फे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. सकाळी दहा वाजता महापालिकेच्या आवारातील मानाच्या गणपतीची प्रथम आरती होऊन विसर्जन सोहळ्यास सुरुवात होईल. त्यानंतर न्यायालय चौकातून भव्य मिरवणुका निघणार असून मार्गावर सुरक्षेसाठी बॅरिकेट्स, प्रकाशयोजना व नियंत्रणाची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे.
मेहरुण तलावावरील गणेश घाट तसेच सेंट टेरेसा शाळेजवळील काठावर विसर्जनाची व्यवस्था केली असून, यासाठी सात तराफे, सहा क्रेन, एक बोट आणि १०० प्रशिक्षित जीव रक्षक तैनात राहणार आहेत. महापालिकेने मूर्ती संकलनासाठी लाठी शाळा, पांझरापोळ शाळा, पिंप्राळा शाळा, निमखेडी गट क्रमांक १०१ येथील टाकी, नाभिक समाज सभागृह व शिवाजीनगर येथे केंद्र उभारले असून, या कामासाठी ४५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. निर्माल्य संकलनासाठी महापालिका कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, स्वयंसेवक व भक्तांचा सहभाग राहणार आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर व खांबांच्या जवळून जाताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्टील रॉड लावलेल्या झेंडे, पताका व सजावटीमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने लाकडी किंवा पीव्हीसी पाईपांचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच, कुठेही वीजवाहक तारा तुटल्याचे आढळल्यास तत्काळ महावितरणच्या आपत्कालीन क्रमांक १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ वर संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यात २,९४६ गणेश मंडळांनी नोंदणी केली असून त्यापैकी २,०८९ सार्वजनिक व ६९७ खासगी मंडळे आहेत. याशिवाय १६० गावांत ‘एक गाव एक गणपती’ परंपरेनुसार विसर्जन होत आहे. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी तीन पोलीस उपअधीक्षक, १० उपनिरीक्षक, १०० अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी व १,८०० गृह रक्षक दल तैनात करण्यात आले असून, स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी देखरेख करत आहेत. मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.