जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२५
पश्चिम बंगालातील कोलकाता येथील न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका व्यक्तीस निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात तक्रारदार महिलेनेच न्यायालयात कबुली दिली की, गैरसमजातून तिने तक्रार दाखल केली होती. पोलिसांत दिलेला अर्ज तिच्या मित्राने लिहिला होता, तर तिने तो न वाचताच स्वाक्षरी केल्याचेही तिने स्पष्ट केले.
२४ नोव्हेंबर २०२० रोजी दाखल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित इसमाला अटक केली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१७ पासून तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत तो फरार झाल्याचा आरोप तिने केला होता. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन ५१ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते.
१४ जानेवारी २०२१ रोजी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. परंतु आता तक्रारदार महिलेनेच आपली फिर्याद मागे घेतल्यामुळे न्यायालयाने आरोपीला निर्दोष घोषित केले. या घडामोडीमुळे खोट्या तक्रारींच्या गांभीर्यावर आणि अशा प्रकरणांत निष्पापांना होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.