साबरमतीच्या धर्तीवर गिरणा रिव्हर फ्रंटची संधी; आमदार भोळे करणार पाठपुरावा

जळगाव समाचार | २ सप्टेंबर २०२५

अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या रिव्हर फ्रंट प्रकल्पाच्या धर्तीवर जळगाव शहरालगतच्या गिरणा नदीवरही पर्यटन प्रकल्प उभारण्याची मोठी संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील प्रस्ताव आमदार सुरेश भोळे यांनी काही काळापूर्वी राज्य सरकारकडे सादर केला असून, पाळधी–तरसोद बाह्यवळण महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.

रिव्हर फ्रंट पर्यटन प्रकल्पाचा उद्देश हा नदीकाठाचे सौंदर्य वृद्धिंगत करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच नागरिकांना विश्रांतीसाठी एक आकर्षक परिसर उपलब्ध करून देणे हा आहे. अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंटवर पायी व सायकलसफरीचे मार्ग, बगीचे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व रेस्टॉरंट्स, बोटिंग–क्रूझिंगच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तो स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचे मोठे आकर्षणकेंद्र ठरले आहे. गिरणा नदीकाठालगत बांभोरी ते कानळदा दरम्यान असा प्रकल्प उभारला गेल्यास जळगाव जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळून स्थानिक गावांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

कानळदा येथील ऐतिहासिक महर्षी कण्वाश्रम हे या प्रस्तावित रिव्हर फ्रंट प्रकल्पाला विशेष महत्त्व देणारे केंद्र ठरू शकते. नव्याने विस्तारत असलेल्या उत्तर जळगावच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी आपण लवकरच पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here