जळगाव समाचार | २ सप्टेंबर २०२५
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान तत्काळ खाली करण्याची नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशी प्रवेशले असून, त्यांची प्रकृतीही खालावत आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये परवानगी रद्द केल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, जरांगे यांच्या प्रसारमाध्यमांवरील वक्तव्यांचीही नोंद घेण्यात आली आहे.
या घडामोडीनंतर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण यापूर्वी जरांगे पाटील यांनी “गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही” अशी ठाम भूमिका मांडली होती. आता या नोटीसीनंतर मराठा आंदोलकांची पुढील भूमिका काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.