जळगाव शहरात ‘मणियार बंधू’ प्रकरणी कुठेतरी सेटलमेंट झाली का?

 

जळगाव समाचार | २ सप्टेंबर २०२५

जळगाव शहरात आयुष कमलकिशोर मणियार आणि पियुष कमलकिशोर मणियार हे दोघे बंधू गेल्या तीन दिवसांपासून खुलेआम फिरत असून, त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. या निष्क्रियतेमुळे पोलिस-प्रशासनावर संशयाचे ढग दाटले आहेत. शहरात “प्रशासनाने कुठेतरी सेटलमेंट केली का?” अशी चर्चा चांगलीच रंगली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पूर्वीच नाकारलेला शस्त्र परवाना अचानक मंजूर होणे हेच प्रशासनातील ढिसाळपणा व दबावाचे दर्शन घडवणारे आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधिकाऱ्यांनी “यांच्या जीवावर कोणताही धोका नाही” असे स्पष्ट करून अर्ज फेटाळला होता. मात्र, अधिकारी बदलताच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी जयपाल हिरे यांच्यासह इतरांनी सकारात्मक नोंदी देत शस्त्र परवाना मंजूर केला. त्यानंतर या बंधूंनी कमरेला पिस्तूल खोचून समाजात उघड दहशत पसरवली, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शासन दरबारी केली होती.

आज प्रश्न असा की – नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा काही बंडखोर तरुणांचे राजकीय पाठबळ अधिक महत्त्वाचे ठरत आहे का? चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या परवान्याच्या रद्दबातलची मागणी करून प्रशासनाची झोप उडवली आहे. पण, तीन दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करणे हे गंभीर शंका निर्माण करणारे आहे. “खाकी डागाळली का?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत असून, मणियार बंधूंसोबत पोलिस-प्रशासनाने नेमकी कोणती ‘सेटलमेंट’ केली आहे, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here