जळगाव समाचार | १ सप्टेंबर २०२५
अमळनेर शहरातून रात्री उशिरा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरुड नाका, शिवाजी नगर भागात रविवारी घरगुती वादातून धक्कादायक खूनाची घटना घडली. वृद्ध राजेंद्र दत्तात्रय कासार (६४) यांचा त्यांच्या मुलगा भूषण कासार याने हातोड्याने वार करून जागीच खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भूषण कासार हा दारूच्या नशेत घरी आला असताना वडिलांसोबत वाद झाला. वाद चिघळताच त्याने संतापाच्या भरात वडिलांच्या डोक्यात, पोटात आणि कंबरेखाली हातोड्याने जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र कासार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत राजेंद्र कासार यांनाही दारूचे व्यसन असल्याचे समोर आले असून त्यावरूनच वादाला अधिक खतपाणी मिळाले होते.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू करत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान संशयित भूषण कासार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास अमळनेर पोलिस करत आहेत.

![]()




