जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्यपरिषद करंडक एकांकिका स्पर्धेच्या जळगाव जिल्हा केंद्रावरील प्राथमिक फेरीत नाट्यरंग थिएटर्स, जळगाव सादर केलेल्या ‘गाईड’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयानंतर नाट्यरंगच्या पथकाने मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. पंढरपूर वारी, विठ्ठलभक्ती आणि अध्यात्माचे सांस्कृतिक महत्त्व उलगडणारी ही संहिता अमोल ठाकूर यांनी लिहून दिग्दर्शित केली होती.
सुहास दुसाने आणि अथर्व रंधे यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांना भावस्पर्शी अनुभव मिळाला. पार्श्वसंगीत पियुष भुक्तार यांनी दिले तर दिशा ठाकूर यांनी रंगभूषा व वेशभूषा केली. रंगमंच व्यवस्था सुयोग राऊत व दर्शन गुजराथी यांनी सांभाळली होती. या एकांकिकेचे परीक्षक पियुष नाशिककर व उमेश घळसासी यांनी कौतुक करीत विजेती ठरवली. नाट्यरंगच्या या यशाबद्दल जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड. संजय राणे, शंभू पाटील, प्रमुख कार्यवाह ॲड. पद्मनाभ देशपांडे, गीतांजली ठाकरे, योगेश शुक्ल व पवन खंबायत यांनी अभिनंदन करून महाअंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.