जळगाव समाचार, अमळनेर (प्रतिनिधी) :
ऋषीपंचमीच्या पारंपरिक धार्मिक महत्त्वानिमित्त अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवारी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांतील महिला भाविकांनी दर्शन, पूजा-अर्चा व अभिषेकासाठी गर्दी केली होती.
ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जाणारा ऋषीपंचमी हा दिवस व्रत आणि उपासनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ऋषींबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक महिलांनी मंदिरात उपस्थिती दर्शवली.
यावेळी मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय व चैतन्यमय वातावरणाने उजळून निघाला होता.