जळगाव समाचार | २६ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या धक्कादायक आणि अमानुष कृत्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका निष्पाप आदिवासी विद्यार्थ्याचा मासिक पास संपला होता, एवढ्या किरकोळ कारणावर बसवाहकाने त्याला अपशब्द वापरत भर पावसात गाडीतून खाली उतरवले. परिणामी त्या लहानग्याला जीव धोक्यात घालून तब्बल दोन ते तीन किलोमीटर पायी चालत घरी जावे लागले. जिल्ह्यात अशा अमानुष घटना घडणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब मानली जात आहे.
बादल राजाराम बारेला (वय ११, रा. उनपदेव, ता. चोपडा) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो दररोज सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अडावद शाळेत जातो. त्याचा मासिक पास १७ ऑगस्टला संपला होता. पासचे नूतनीकरण न झाल्याचे समजताच बसवाहकाने संतुलन गमावत त्याला पावसातच गाडीतून खाली उतरवले. निर्दयी वागणुकीमुळे त्या लहानग्याला मुसळधार पावसात भिजत दोन-तीन किलोमीटर पायी चालत पाड्यावर पोहोचावे लागले. एका शाळकरी मुलाशी अशा रीतीने वागणे ही एसटी प्रशासनाची अमानुष व निर्दयी वृत्ती उघड करणारी बाब ठरत आहे.
या प्रकाराविरोधात कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुड्याचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी चोपडा आगार व्यवस्थापकांकडे निवेदन देत जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शाळकरी मुलाला भर पावसात भिजवत रस्त्यात उतरवणे हा अमानुषपणा असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने शिक्षात्मक कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.