जळगाव समाचार | २६ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदात मोठा बदल केला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडाऱ्याची जबाबदारी काढून घेऊन ती पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उपसचिव दिलीप देशपांडे यांनी याबाबतचे पत्र जारी केले. सावकारे यांच्यावर केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला भंडाऱ्यात येण्याचा आरोप होत होता, तसेच जिल्ह्याच्या कामकाजात त्यांची पुरेशी उपस्थिती नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती.
पंकज भोयर हे आधीपासून गोंदियाचे सहपालकमंत्री असून, आता त्यांच्याकडे भंडाऱ्याचीही धुरा देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील असल्याने त्यांना भंडाऱ्याची भौगोलिक व सामाजिक जाण असल्याचे मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांवर पकड मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना पंकज भोयर यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. “भंडारा जिल्ह्यात चांगले काम करून नागरिकांचा विश्वास जिंकू. वर्ध्याप्रमाणेच भंडाऱ्यातही विविध योजना आणण्याचा प्रयत्न करू,” असे ते म्हणाले. तर संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नेमण्यात आले असून, त्यांच्या डिमोशनमागील नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

![]()




