जळगाव समाचार | २५ ऑगस्ट २०२५
जिल्हा परिषदेने नागरिकांसाठी एक अभिनव डिजिटल उपक्रम राबविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून ‘व्हॉट्सअॅप चॅटबोट’ सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत माहिती मिळवणे आणि तक्रारी नोंदवणे अधिक सुलभ होणार आहे. नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक 9421610645 वर संदेश पाठवून ही सेवा वापरता येईल. तसेच, ही सुविधा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (www.zpjalgaon.gov.in) देखील उपलब्ध आहे.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभाग, योजना आणि सेवा याबाबतची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. तक्रारींचे निवारण त्वरित करता येईल, त्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होईल. डिजिटल गव्हर्नन्स व ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून हा महत्त्वपूर्ण प्रयोग राबविण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, “नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा जलद आणि प्रभावीपणे पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या चॅटबोटमुळे तक्रारी नोंदवणे व योजनांची माहिती मिळवणे सोपे झाले असून प्रशासन अधिक कार्यक्षम होणार आहे.” जिल्हा परिषदेचा हा उपक्रम नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

![]()




