जळगाव समाचार | २५ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’ राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि सुलभ पद्धतीने सेंद्रिय शेती करता यावी, यासाठी या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शेतकऱ्यांना युनिट खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त मानले जाणारे हे यंत्र ड्रिप किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणालीशी जोडले जाते. यामधून शेण, गोमूत्र व इतर सेंद्रिय घटकांपासून तयार जीवामृत फिल्टर करून पिकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचवले जाते. या प्रक्रियेमुळे उत्पादनक्षमता वाढते, जमिनीची सुपीकता सुधारते आणि रासायनिक खतांवरील खर्च घटतो. ५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी ₹१०,७५०, ५०१ ते ११०० लिटर क्षमतेसाठी ₹१४,००० तर १३०० ते १५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी ₹१८,००० इतके अनुदान उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याची मुदत २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागाकडे अर्ज दाखल करावा. अर्जासोबत ७/१२ उतारा, ८अ उतारा, जनावरे असल्याचे प्रमाणपत्र, अग्रीस्टॅंक नोंदणी पत्र, बँक पासबुक व आधार कार्डच्या प्रती जोडणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

![]()




