जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा; सालदार गडींचा सपत्नीक सत्कार

 

जळगाव समाचार | २२ ऑगस्ट २०२५

कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपारिक पोळा सणाचे औचित्य साधून जैन हिल्स येथे रविवारी भव्य उत्सव पार पडला. विश्वगर्जना युवा सदस्यांच्या १०० ढोलवादकांचे वादन, आदिवासी पारंपारिक नृत्य व सालदारगडींचे संबळावरचे नृत्य या सगळ्यांमुळे जैन हिल्सवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी २९ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा यावर्षीही मोठ्या जल्लोषात पार पडली.

कंपनीच्या कृषी विभागाच्या विविध साईटवरील बैलजोड्यांची व सालदारगडींची सवाद्य मिरवणूक ‘श्रद्धाज्योत’ स्मृतिस्थळापर्यंत काढण्यात आली. मारुती मंदिर व सरस्वती पॉईंट मार्गे ही मिरवणूक हेलीपॅड मैदानात पोहोचली. यावेळी अशोक जैन यांच्या हस्ते ध्वजफडकावून पोळा उत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमात अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व सौ. ऐश्वर्या रेड्डी, जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, डॉ. शेखर रायसोनी, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, महाराष्ट्र क्रेडाई उपाध्यक्ष अनिश शहा, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, स्वरुप लुंकड, पारस राका, गोटूशेठ बंब, नंदलाल गादीया, माजी नगरसेवक अमर जैन, डॉ. उल्हास पाटील, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. कल्याणी नागुलकर, प्रो. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने वृषभराजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पोळा फोडण्याच्या पारितोषिक वितरणाचा सोहळा रंगला. यंदा पारितोषिकात वाढ करण्यात आली असून २० हजार रुपयांची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत झाली. त्यात अविनाश गोपाळ व हंसराज थावरस जाधव यांना पहिला मान मिळाला. हंसराज जाधव यांनी सलग चौथ्यांदा पोळा फोडण्याचा मान पटकावला. दिलीप पावरा व साजन पावरा यांना दुसरा मान तर गोविंद पावरा, भगवान सावळे, वाल्मिक शिंदे, किशोर शिंदे, रामसिंग पवार यांना तिसरा मान मिळाला.

जैन इरिगेशनच्या कृषी विभागातील ३१ सालदार गडी व ३२ पेक्षा अधिक बैलजोड्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, सेवानिवृत्त वनाधिकारी राजेंद्र राणे, डॉ. इंगळे, विजयसिंग पाटील, डॉ. कल्याणी मोहरीर यांच्यासह मान्यवरांनी गौरव केला. सूत्रसंचालन किशोर कुलकर्णी यांनी केले.

यावेळी यावल तालुक्यातील रोशनबर्डी येथील वालू सोनासिंग बारेला यांच्या आदिवासी कलापथकाने पारंपारिक नृत्य सादर केले. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी मानधनाऐवजी फळझाडे मागितली. तसेच विश्वगर्जना ढोल पथकाचे वादन, अनुभूती स्कूल व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे नृत्य, शिरसोली येथील बॅण्ड पथक व संबळावरील नृत्याविष्कारांनी पोळा उत्सव अविस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here