जळगाव समाचार | १२ जून २०२५
जिल्ह्यात बुधवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने थैमान घातले. काही भागांत विजा पडल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, शेती, घरे, जनावरे आणि वाहतूक यांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले असून, जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत.
नशिराबाद परिसरात वादळी वाऱ्यामुळे दोन घरांची पत्रे उडून गेली. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित नागरिकांना तात्पुरत्या सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने हटवण्यात आली आहेत. प्रशासनाकडून आवश्यक ती मदत व पुनर्बांधणीचे कार्य सुरु आहे.
दरम्यान, राणीचे बांबरुड (ता. पाचोरा) येथे राहत्या घरात वीज पडल्याने पितांबर आत्माराम वाघ (वय ५०) यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, फरकांडे (ता. एरंडोल) येथे देखील घराचे पत्रे उडाल्याने नारायण सीताराम पाटील (वय ६८) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चाळीसगाव शहरात देखील वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे एका घराचे पत्रे उडाले तर दुसऱ्या ठिकाणी रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अग्निशमन दलाच्या मदतीने झाड हटवण्यात आले आहे. येथेही पंचनामा करण्यात आलेला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील एका कांदा चाळीवर वीज पडल्यामुळे सुमारे ३०० क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. तालुका प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, शेतकऱ्याचे सांत्वन केले आहे.
पाचोरा तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले असून काही घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. यासाठी सकाळपासून सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पोलीस पाटील व कोतवाल यांच्या समन्वयाने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तहसीलदारांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रस्त्यांवर पडलेली झाडे नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने हटवण्यात आली आहेत.
मौजे कुरुंगी येथे सुभाष बापू पाटील यांच्या गाईचा मृत्यू झाला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले आहे. तसेच घराचे पत्रे पडून दोन नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजेचा धक्का बसून एक बैल मरण पावला आहे. कालच्या पावसामुळे केळीच्या पिकालाही मोठे नुकसान झाले असून कृषी सहाय्यक व तलाठी संयुक्तपणे पंचनामे करत आहेत.
महावितरणच्या मदतीने विद्युत खांब व तारा दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिक, पोलीस आणि नगरपालिका प्रशासन एकत्रित प्रयत्न करत आहेत.
जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. नागरिकांना अधिकृत सूचना व खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

![]()




