AIच्या युगात महिलांची गोपनीयता धोक्यात; पण ही वेबसाईट ठरतेय महिलांसाठी डिजिटल कवच!

 

जळगाव समाचार | १० जून २०२५

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सोशल मीडियावर अश्लीलतेचे प्रकारही वाढीस लागले आहेत. काल जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा चेहरा वापरून एआयच्या मदतीने बनवलेला अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार धक्कादायक असतानाच, अशा गंभीर प्रसंगांमध्ये महिलांना आधार देणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था WWW.StopNCII.org चर्चेत आली आहे.

नॉन-कन्सेन्सुअल इंटिमेट इमेज अ‍ॅब्यूज म्हणजेच परवानगीशिवाय प्रसारित करण्यात आलेल्या खाजगी आणि अश्लील फोटो व व्हिडीओच्या विरोधात लढणाऱ्या या संस्थेने आजवर जगभरातून २ लाखांहून अधिक फोटो इंटरनेटवरून हटवले आहेत. ही मोहीम ‘SWGfL’ (South West Grid for Learning) या संस्थेच्या ‘Revenge Porn Helpline’ अंतर्गत चालवली जाते.

‘StopNCII.org’ या वेबसाईटवर कोणतीही महिला किंवा पुरुष मोफत तक्रार दाखल करू शकतो. वापरकर्त्यांना अशा पोस्टचा फोटो, लिंक किंवा व्हिडीओ यांची माहिती द्यावी लागते. त्यावर आधारित एक हॅशिंग अल्गोरिदम वापरून एक विशिष्ट व्हॅल्यू तयार केली जाते आणि ती व्हॅल्यू जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, पॉर्नहब, ओन्लीफॅन्स अशा मोठमोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना पाठवली जाते. ही व्हॅल्यू ज्या कंटेंटशी मॅच होईल तो कंटेंट लगेच हटविण्यात येतो. विशेष म्हणजे भविष्यात जरी कोणी अशा प्रकारचा फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न केला तरीही तो तत्काळ हटवला जातो.

या संस्थेचा यशाचा दर तब्बल ९० टक्क्यांपर्यंत असून केवळ १० टक्के प्रकरणांमध्येच अपयश येते. त्यामुळे अशा प्रसंगी महिलांनी घाबरून न जाता योग्य मार्गाचा अवलंब करणे अधिक गरजेचे आहे. अनेक वेळा लाजेखातर किंवा ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिला आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मात्र ‘StopNCII.org’ सारख्या संस्थांमुळे महिलांना आता संरक्षण मिळू शकते.

ही वेबसाईट वापरणे अत्यंत सोपे असून गोपनीयतेचे भान राखून संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे अशा प्रकारांपासून स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी ही माहिती सर्वत्र पोहोचवणे गरजेचे आहे.

सोशल मीडियाच्या युगात एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि पीडित महिलांना मदतीचा हात देण्यासाठी ‘StopNCII.org’ हे एक महत्त्वाचे हत्यार ठरत आहे. त्यामुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याआधी ही माहिती शेअर करून योग्य त्या वेळी योग्य ती मदत मिळवणे हे आपल्या सर्वांच्या जबाबदारीचे ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here