जळगाव समाचार | 9 जून 2025
मुंबईच्या मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. कसारा दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस मधून प्रवास करत असताना, पाच प्रवासी ट्रेनमधून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दिवा ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान घडला.
प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे काही प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते. याच वेळी ट्रेन धावत असताना अचानकपणे पाच प्रवासी खाली पडले. अपघाताची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि जखमींना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सर्व पाच प्रवाशांना मृत घोषित केल्याचे समजते.
या घटनेबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यामुळे या अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना उचलताना दाखवले आहे. प्रवाशांचे कपडे फाटलेले होते आणि गंभीर जखमाही झाल्या होत्या.
मुंब्रा स्थानकाजवळील गार्डकडून ही घटना रेल्वे नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ते सर्वजण ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे समजते.
रेल्वे प्रशासन आणि सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.