जळगाव समाचार | ९ जून २०२५
इंदूरमधील राजा रघुवंशी यांची मेघालयात निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हनीमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह ११ दिवसांनी एका दरीत आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या पत्नी सोनमनेच तिघांच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.
राजा आणि सोनम २२ मे रोजी हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते. दुसऱ्याच दिवशी, २३ मे रोजी ते चेरापुंजीजवळील ओसारा हिल्स परिसरात ट्रेकिंगसाठी गेले आणि तिथून बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.
११ दिवसांनी, ३ जून रोजी, पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने २०० फूट खोल दरीत एका झाडावर लटकलेला राजाचा मृतदेह शोधून काढला. त्यांची दुचाकी मृतदेहापासून २५ किमी अंतरावर सापडली. राजाचा मोबाईल, सोन्याचे दागिने गायब होते; फक्त स्मार्टवॉच मिळाले.
पोलिसांनी तपास सुरू केला असता, सोनम स्वतःही बेपत्ता होती. राजाच्या कुटुंबाने सीबीआय चौकशी आणि भारतीय लष्कराच्या मदतीची मागणी केली होती.
दरम्यान, सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. तपासात उघड झाले की, सोनमने पतीच्या हत्येसाठी मध्य प्रदेशातील तिघांना सुपारी दिली होती. मेघालय पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी “एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, पोलिसांनी सात दिवसांत खटल्याचे गूढ उकलले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.