जळगाव समाचार | ४ जून २०२५
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ४० वर्षीय प्रॉपर्टी डीलर रामेश्वर नथू बिजागर यांनी मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते तालुक्यात प्रसिद्ध प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळखले जात होते.
मंगळवारी दुपारी एक वाजता त्यांनी भवानी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मित्रांसोबत जेवण केले. जेवणानंतर त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला फोन करून आत्महत्या करण्याची माहिती दिली. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र थोड्याच वेळात त्यांचा फोन बंद येऊ लागला.
मित्रांनी लोकेशनवरून शोध घेतला असता बिजागर हे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी घाटात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही लोकांची नावे असून, जमिनीच्या व्यवहारात झालेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिस तपासानंतर या घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
रामेश्वर बिजागर यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.