जळगाव समाचार | २७ मे २०२५
मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिने सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर करत मराठी अभिनेता सुदेश म्हशीलकर याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुदेशने तिला “तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव” असा मेसेज पाठवला असल्याचे प्राचीने सांगितले आहे.
प्राचीने हा मेसेज फेसबुकवर मिळाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला असून, त्यात सुदेशने “कसली गोड दिसतेस” असेही म्हटले आहे. यावर प्राचीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले, “आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली आहे. तुझ्याकडे बायकोचा नंबर असेलच, तिच्याशी फ्लर्ट करून बघ.”
याशिवाय, प्राचीने सांगितले की, सुदेशने तिला इन्स्टाग्रामवरही मेसेज केला आहे आणि तीच माहिती तिने पुन्हा एकदा स्क्रीनशॉटसह शेअर केली आहे.
प्राचीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिले की, “मला धमकावून ही पोस्ट डिलीट करण्यासाठी आणि गप्प राहण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी आता ही पोस्ट कायम ठेवणार आहे, तोपर्यंत जोपर्यंत सुदेश म्हशीलकर फेसबुकवर माफी मागत नाही.” तिने हेही सूचित केले की, जर गरज भासली, तर इतर मुलींनाही यासंदर्भात बोलायला लावेल.
दरम्यान, सुदेश म्हशीलकर हे ‘भाग्य दिले तू मला’, ‘श्रीमंत घरची सून’, ‘अवघाची संसार’, ‘रानबाजार’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकले आहेत. प्राची पिसाट ही झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ मालिकेतील ‘तारा’ या भूमिकेमुळे ओळखली जाते.