जळगाव समाचार | २५ मे २०२५
चोपडा शहरातील जुन्या पंचायत समिती कार्यालयाजवळ शनिवारी (24 मे) मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. संशयित आरोपी राजू काशीराम बारेला (वय 35, मूळ रहिवासी – मध्यप्रदेश, सध्या – चोपडा) याला पोलिसांनी काही तासांत अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू बारेला हा प्यारी बारेला (नाव बदललेले) या ओळखीच्या महिलेसोबत बंद पडलेल्या कार्यालयाजवळ राहत होता. शनिवारी रात्री 2 वाजता तो घरी परतला असता, त्याने प्यारीला एका अज्ञात व्यक्तीसोबत पाहिले. त्याला त्यांच्या नात्याबद्दल संशय आला आणि रागाच्या भरात त्याने त्या अज्ञात व्यक्तीवर काठीने आणि दगडाने वार करून ठार मारले.
खून केल्यानंतर राजू घटनास्थळावरून फरार झाला. मात्र सकाळी 6 वाजता मृतदेह आढळून आल्यावर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने राजूला गोरगावले रोडवरून अटक केली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी यांच्या फिर्यादीवरून राजू बारेलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.