जळगाव समाचार | २१ मे २०२५
जालना येथून भुसावळला आलेल्या दोन नातेवाईकांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी सकाळी घडली. मृतांमध्ये मामा आणि भाचा यांचा समावेश आहे. त्यांची नावे रामराजे नंदलाल नाटेकर (वय ५५, रा. जालना) आणि आर्यन नितीन काळे (वय २१, रा. जालना) अशी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रामराजे नाटेकर आणि आर्यन काळे हे दोघे भुसावळ शहरातील मामाची टॉकीज परिसरातील पेंढारवाडा येथे, संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्या घरी देवकार्याच्या निमित्ताने आले होते.
२१ मे रोजी सकाळच्या सुमारास हे दोघे तापी नदीत आंघोळीसाठी गेले. आंघोळ करत असताना अचानक पाय घसरल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोघांना पाण्यातून बाहेर काढून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले.