जळगाव समाचार | २१ मे २०२५
यावल तालुक्यातील महेलखेडी गावातील मुस्कान अल्ताफ तडवी (वय 20) या विवाहितेने विरावली गावाजवळ शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा पती अल्ताफ तडवी याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना हा प्रकार घडला.
मुस्कानने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगितले व गट क्रमांक 57 मधील शेताजवळ उतरून थेट विहिरीत उडी घेतली. तिचा पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी धाव घेत तिला विहिरीतून बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुस्कानच्या माहेरील नातेवाइकांनी तिच्या पतीवरच तिला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाचा तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत.