सिनेस्टाईल थरार : ग्रामपंचायत अधिकाऱ्याने लाच घेत ठोकली धूम; ACBने पाठलाग करत घेतला ताब्यात…

 

जळगाव समाचार | २० मे २०२५

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत तामसवाडी ग्रामपंचायतीतील अधिकारी दिनेश साळुंखे (वय ५३) यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

साळुंखे यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामासाठी एका ठेकेदाराकडे लाच मागितली होती. कामाचे बिल देताना त्यांनी १० टक्के रक्कम म्हणजेच ४० हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार ठेकेदाराने याची माहिती एसीबीकडे दिली. १९ मे रोजी अमळनेरमध्ये सापळा रचण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे साळुंखे यांनी लाच घेतली. लाच घेतल्यानंतर ते दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यांच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या पथकाने केली.

एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुणी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लगेच ACB कार्यालयात तक्रार करावी. संपर्कासाठी क्रमांक: ०२५६२-२३४०२० / टोल फ्री १०६४.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here