जळगाव समाचार | १७ मे २०२५
देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया (VIL) सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. कंपनीनं भारत सरकारकडे मोठ्या मदतीची मागणी केली असून, मदत न मिळाल्यास आर्थिक वर्ष २०२६ नंतर भारतात आपलं कामकाज चालू ठेवणं अशक्य होईल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
१७ एप्रिल २०२५ रोजी कंपनीनं दूरसंचार विभागाला पत्र लिहून ही मदत मागितली आहे. यामध्ये कंपनीचे सीईओ अक्षय मुंदडा यांनी सांगितलं की, “सरकारनं एजीआर (Adjusted Gross Revenue) संदर्भात वेळेवर मदत केली नाही तर बँका कर्ज देणार नाहीत आणि कंपनीचं कामकाज ठप्प होईल.”
कंपनीनं सुमारे ३० हजार कोटी रुपयांची एजीआर थकबाकी माफ करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. न्यायालयाने याचिकेवर १९ मे रोजी सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.
जर सरकारनं वेळेवर मदत केली नाही, तर कंपनीला दिवाळखोरीसंबंधी प्रक्रिया (NCLT) पार करावी लागेल. यामुळे नेटवर्क सेवा खंडित होण्याची शक्यता आहे आणि सुमारे २० कोटी युजर्सना दुसऱ्या कंपन्यांकडे वळावं लागू शकतं.
व्होडाफोन आयडियाचा इशारा आहे की, वेळेवर मदत मिळाल्यास सामान्य लोक आणि भारतीय अर्थव्यवस्थेचाही फायदा होईल.