जळगाव समाचार | ४ मे २०२५
बोदवड तालुक्यातील शेलवड येथे १ ते ५ मे दरम्यान सुरू असलेल्या नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘श्री बाळासाहेब संगीत नाट्य मंडळ, लोणी (ता. जामनेर)’ यांनी ‘अग्निपथ’ हे सामाजिक नाटक सादर केले. हे नाटक लेखक जगन्नाथ शिंदे यांनी लिहिले असून दिग्दर्शक दीपक बोरसे होते.
शुक्रवारी रात्री ८ वाजता रंगमंचावर सादर झालेले हे नाटक एक सासू-सुनेतील तणाव आणि पैशासाठी झालेल्या क्रूरतेवर आधारित होते. माई ही सासू मोहाच्या अंधारात सुनेचा छळ करते आणि शेवटी तिला जाळून टाकते. पोलिसांकडून अटक झाल्यावर पश्चात्तापाची भावना जागृत होते. या कथानकाने प्रेक्षकांवर भावनिक प्रभाव टाकला.
नाटकात दीपक बोरसे (माई), उखर्डू आढावने (नाना), दिलीप आहेर (बाबा), सत्यवान बऱ्हाटे (मामा), अजय बोरसे (शेखर), नीलेश उगले (राजेंद्र), आणि पंकज चिकटे (वनिता) यांनी भूमिका साकारल्या.
प्रेक्षकांनी नाटकाचे सादरीकरण एकाच जागी बसून मोठ्या उत्साहाने पाहिले. नाटकानंतर श्री बालाजी प्रासादिक संगीत नाट्य मंडळ शेलवडचे अध्यक्ष रमणसिंग पाटील यांच्या हस्ते सहभागी नाट्य मंडळाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
शेलवड येथील शेकडो वर्षांची समृद्ध नाट्यपरंपरा आजही टिकून आहे आणि स्थानिक कलावंतांच्या तळमळीमुळे ती अधिक बळकट होत असल्याचे या प्रसंगी नमूद करण्यात आले.