जळगाव समाचार | ३ मे २०२५
पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथून कामासाठी जळगाव शहरात आलेल्या मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २ मे रोजी सकाळी ८ वाजता जळगाव बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहम्मद शफी हे रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय करत होते आणि २८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात शिक्के देण्यासाठी आले होते. शिक्के दिल्यानंतर ते बेपत्ता झाले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
शुक्रवारी सकाळी एका हॉटेलमधून दुर्गंधी आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडल्यावर खोलीत मोहम्मद शफी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली.
पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मोहम्मद शफी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.