जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२५
कोलकात्यातील मोठा बाजार परिसरात मंगळवारी रात्री एक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. ‘ऋतुराज हॉटेल’मध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ११ पुरुष, १ महिला आणि दोन लहान मुले आहेत. आगीत अडकलेल्या सुमारे ५० जणांचा वाचवण्यात यश आलं आहे.
ही आग काल रात्री ८.१५ वाजता लागली. प्राथमिक माहितीनुसार, आग हॉटेलच्या किचनमध्ये लागली आणि संपूर्ण इमारतीत पसरली. आग लागल्यावर अनेक लोक वरच्या मजल्यांकडे पळाले. एक कर्मचारी, मनोज पासवान, जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उडी मारली, पण त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
फायर ब्रिगेडला रस्ता अरुंद असल्यामुळे आत पोहोचायला अडचणी आल्या. शेवटी भिंत फोडून आत प्रवेश करावा लागला. आग विझवण्यासाठी अनेक गाड्या काम करत होत्या. काही लोकांना शिडीच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आलं.
फायर ब्रिगेडच्या मते, हॉटेलमध्ये योग्य अग्निसुरक्षा उपाय नव्हते. त्यामुळेच आग इतकी मोठी झाली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, विशेष तपास पथकही तयार करण्यात आलं आहे.
या घटनेमुळे कोलकाता हादरलं असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून दोषींवर कारवाईचं आश्वासन देण्यात आलं आहे.