जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२५
१६ वर्षांपूर्वी पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फॅक्टरीचे तीन मालक गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे आणि मनीषा शिरोळे यांना १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना १० एप्रिल २००९ रोजी घडली होती. फॅक्टरीत स्फोटक साहित्य असल्याने आग लागल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि आगीचे लोळ उठले. यामध्ये पुरुष, महिला आणि बालकामगार मिळून २१ जणांचा मृत्यू झाला आणि ३९ जण जखमी झाले होते.
तपासात आढळून आले की, आगीच्या काही दिवस आधीच फॅक्टरीचा परवाना संपला होता. कामगारांना योग्य प्रशिक्षण नव्हते, सुविधा अपुऱ्या होत्या आणि बालकामगार कायद्याचाही भंग झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात एकूण ४२ साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी ३८ साक्षीदार फितूर झाले. मात्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ. योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके, जबाब घेणारे तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्ष ग्राह्य धरून मालकांना दोषी ठरवले.
त्यांना IPC कलम ३०४ (२) अंतर्गत १० वर्षांची शिक्षा व स्फोटक कायद्यानुसार २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत. याशिवाय प्रत्येकी दंडही ठोठावण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. राजेंद्र चौधरी यांनी या प्रकरणात काम पाहिले.