जळगाव समाचार | बुधवार, २३ एप्रिल २०२५
राज्य शासनाच्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक म्हणजेच १३४ टक्के घरकुले पूर्ण करून जिल्ह्याने राज्यात आपली वेगळी छाप उमटवली आहे.
१०० दिवसांत ८ हजार ३६२ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना जळगाव जिल्ह्यात तब्बल ११ हजार २४४ घरकुले पूर्ण करण्यात आली. या कामगिरीबद्दल ग्रामीण गृहनिर्माण योजनेचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर २०२४ रोजी १०० दिवसीय कार्यक्रमांची घोषणा केली होती. यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी खालीलप्रमाणे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती – किमान १३ लाख घरकुलांना मंजुरी, ३ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता, १ लाख घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे आणि ५ हजार लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे.
या उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर महाआवास अभियान राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्याने घेतलेली झपाट्याने काम करण्याची भूमिका आणि यशस्वी अंमलबजावणीमुळे हजारो कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. ही कामगिरी प्रशंसनीय आणि इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ. दिघे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.